top of page

स्किझोफ्रेनिया : भावना, विचार आणि वर्तन ह्यामधील सुसूत्रतेचा अभाव

स्किझोफ्रेनिया म्हणजेच छिन्नमनस्कता हा गंभीर मानसिक आजार असला तरीही ह्या आजारावर आजाराच्या सुरूवातीपासून केलेल्या योग्य आणि नियमित उपचारांनी बर्‍यापैकी नियंत्रण मिळवता येते. उपचारांमध्ये प्रामुख्याने औषधं आणि मानसोपचार यांचा समावेश होतो. 


औषधं वर्तनात जाणवणारी लक्षणं जसं की - झोपेचं बिघडलेलं प्रमाण दुरुस्त करणे, असंबद्ध बडबड, विचित्र हालचाली यांवर नियंत्रण आणणे, वास्तवाशी तुटलेला संपर्क पुनर्स्थापित करणे, भ्रम आणि भास कमी करणे इ. आटोक्यात आणण्याचं काम करतात. ज्या रसायनांच्या असमतोलामुळे ही लक्षणं उद्भवतात, त्या रसायनांचं प्रमाण संतुलित करण्यासाठी लक्षणांच्या प्रमाण आणि तीव्रतेनुसार मनोविकार तज्ञ तशी औषध योजना करतात. सुधारणेमधील औषधांची भूमिका अतिशय मोलाची असते. ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चोख काम करते. मात्र औषधांमध्ये तसेच औषधांची मात्रा (dose), वेळा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल आजारी व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाइकांनी स्वतःच्या मर्जीनुसार करू नयेत. औषधांच्या बाबतीत कोणताही निर्णय आपल्या मनोविकार तज्ञांना घेऊ द्यावा. आपण लक्षणांची नोंद ठेवून नेमकेपणाने डॉक्टरांना सांगणे, त्याबाबत वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करणे, औषधांमुळे होणार्‍या दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांना कल्पना देणे, त्यातून बाहेर पाडण्यासाठी इतर तंत्रांचा अवलंब करणे इ. बाबींना काळजीपूर्वक हाताळलं तर डॉक्टरांना अधिक उपयुक्त औषध योजना करण्यात मदत होते. 

ree

ढोबळमानाने दिसणारी आणि इतरांना त्रासदायक ठरणारी सकारात्मक लक्षणं तुलनेने लवकर आटोक्यात येतात. त्यापुढची सूक्ष्म आणि तरल (subtle) अशी संज्ञानात्मक म्हणजेच आकलन विषयक (cognitive) लक्षणं आटोक्यात आणण्यात मानसोपचार तज्ञ / मानसशास्त्रीय समुपदेशकाचं अनन्य साधारण महत्व आहे. समुपदेशन प्रक्रिया विचार - भावना आणि वर्तनाच्या एकत्रित यंत्रणेवर काम करत असल्यामुळे दीर्घकाळ चालते. या प्रक्रियेचे तात्पुरते दुष्परिणाम जाणवू शकतात. जसे की - जुन्या घटनाक्रमांची उजळणी होऊन विचारांची आणि भावनांची गुंतागुंत वाढणे, बाजूला सारलेल्या आठवणी उफाळून येणे, झोप न लागणे, थकवा जाणवणे, सतत मूड बदलणे इ. मात्र हे दुष्परिणाम काही काळापुरते असतात. त्यांच्याबद्दल पुढील समुपदेशन सत्रात चर्चा करणं आवश्यक असतं. मनाच्या संरक्षक यंत्रणेच्या कार्यामुळे दमन केलेल्या बाबींना हाताळण्याचा  समुपदेशन प्रक्रियेतील हा महत्वाचा टप्पा असतो.  


औषधांकडे बघण्याचा दृष्टीकोन, आजाराबद्दलची अंतर्दृष्टी, आजाराला हाताळण्याच्या विविध पद्धती, लक्षणांची नेमकेपणाने नोंद ठेवणे, भावनांचे - विचारांचे चढ - उतार, आंदोलनं हाताळणे अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह सुद्धा समुपदेशन प्रक्रियेचा एक भाग असतो. ह्या प्रकियेत वेगवेगळ्या मानसोपचार तंत्र आणि उपचार पद्धतींचा वापर केला जातो. ह्या प्रक्रियेचे फायदे किंवा यश मानसोपचारकाचे ज्ञान आणि अनुभव, आजारी व्यक्तीने उपचार पद्धतींचा केलेला स्वीकार आणि स्वतःवर काम करताना दाखवलेली प्रामाणिकता, कुटुंबियांची साथ याबरोबरच आजाराचे स्वरूप आणि त्यातली लक्षणांची गुंतागुंत या सगळ्या घटकांवर अवलंबून असते. 


मानसिक आजारांमध्ये कमी झालेली किंवा हरवलेली संज्ञानात्मक कौशल्यं (cognitive) एकेक करत पुन्हा प्रस्थापित करणं, आत्मविश्वास आणि आशा निर्माण करणं, नकारात्मक भावनांना दूर सारणं, स्वतःची मदत यंत्रणा तयार करायला मदत करणं अशा तुलनेने छोट्या वाटणार्‍या मात्र एकंदर जीवनावर खोल परिणाम करणार्‍या गोष्टी मानसशास्त्रीय समुपदेशन प्रक्रियेत हाताळल्या जातात. म्हणूनच मानसिक आजारांचा सामना करताना मानसशास्त्रीय समुपदेशन प्रक्रियेला औषधांच्या बरोबरीने प्राथमिकता देणं फायदेशीर ठरतं. 


एकंदरीत औषधांच्या मर्यादित पण आवश्यक भूमिकेला योग्य मानसोपचारांची जोड देऊन स्किझोफ्रेनिया आणि त्या सारख्या इतर गंभीर किंवा सामान्य मानसिक आजारांचा निश्चितच सामना करता येतो. आजारी व्यक्ती थोड्या फार फरकाने आपल्यासारखे आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगू शकतात. कदाचित जीवनाच्या अधिक खोलात जाऊन सहज स्वीकाराची कलाटणी ह्या आजारांच्या निमित्ताने मिळते.   


मीनाक्षी 

मानसोपचारक 



 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
लोगो transparent.png

मानसिक आरोग्य ही शारीरिक, मानसिक - भावनिक आघातातून स्वतःला बरे करण्याची आणि जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे वाटचाल करण्याची प्रक्रिया आहे.

आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी ...
  • Youtube
  • Instagram
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करा ...

संपर्क: ०२३६३-२९९६२९ / ९४२०८८०५२९

ईमेल: info@sahajtrust.org

च्या

© सहज ट्रस्ट, गाळेल, सिंधुदुर्ग

Wix द्वारा समर्थित आणि सुरक्षित

bottom of page