प्राणिमात्रांवर प्रेम, उपचार ... मग
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 2 min read
पाळीव प्राण्यांना आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा दर्जा असणं, त्यांच्याशी प्रेमाने संवाद करणं, त्यांचे लाड करणं, त्यांच्या खोड्या सुद्धा कौतुकाने सांगणं ही आपल्या सांस्कृतिक वारशाची खूणगाठ आहे. मुके प्राणी आणि माणूस यांच्या अनोख्या नात्याच्या कितीतरी गोष्टी, उदाहरणं आपण ऐकतो, प्रत्यक्ष पाहतो. गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये सुद्धा प्राणी हौसेने पाळले जातात. मानसोपचारांमध्ये pet therapy चा उपयोग चिंता, नैराश्य, एकटेपणा अशा नकारात्मक भावनांना घालवण्यासाठी केला जातो.
आपल्या प्राण्याला काहीही आजार झाला की घरातल्या सगळ्याच व्यक्ती काळजीत असतात. प्राणी त्यांना नक्की काय होतंय हे सांगू शकत नाहीत, स्वतः डॉक्टरकडे जाऊ शकत नाहीत, स्वतः स्वतःवर उपचार करू शकत नाहीत. त्यांची आपल्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा असत नाही. म्हणजे तसं आपण गृहीत धरलेलं आहे. (अपेक्षा असते, ती आपल्याला कळते, आपण ती पुरवतो सुद्धा! फक्त त्या अपेक्षा माणसांच्या अपेक्षांच्या तुलनेत फारच सोप्या आणि नगण्य असतात.) म्हणून आपण त्यांच्यावर जे प्रेम करतो ते त्यातल्या त्यात निरपेक्ष भावनेने करतो. प्राण्यांच्या आजारपणात त्यांची अगदी जातीनिशी काळजी घेतो. अगदी रस्त्यावरच्या प्राण्यांसाठी आपण माणसांनी वेगवेगळी मदत केंद्रं सुद्धा उभी केली आहेत.

आपण प्राणिमात्रांवर उपचार करताना आपण वेळ, पैसा, ऊर्जा यांचा फार काटेकोर विचार करत नाही. मग हा प्रेमभाव, आपुलकी, दया, काळजी मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीच्या बाबतीत कुठल्या धुक्यात गडप होतात? आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीकडून आपल्या वेगवगळ्या अपेक्षा असतात. त्या व्यक्तीने आपलं ऐकावं, नुसतंच ऐकावं असं नाही तर सगळंच ऐकावं, लगेच ऐकावं असं आपल्याला वाटतं. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती विशिष्ट वर्तन मुद्दाम करते, औषधोपचारांचा काहीही उपयोग होत नाही, ही व्यक्ती उत्पादकतेच्या दृष्टीने काहीही उपयोगाची नाही, तिला आपल्या प्रेमाची किंमत नाही अशा विचारांतून बरेचदा मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती कुटुंबातील आणि समाजातील इतरही व्यक्तीच्या प्रेमाला पारखी होते.
आजाराने त्रस्त व्यक्तीवर उपचारांचा काय, किती, कसा परिणाम व्हावा याबद्दलच्या आपल्या अपेक्षाही आपल्या अज्ञानावर आधारित असतात. मानसिक आजाराबद्दल, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीबद्दल आपले गैरसमज केवळ एखाद्या ऐकीव किंवा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असतात. पण मुळातच तो अनुभव अर्धवट आणि अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असण्याची शक्यता जास्त आहे. अनेकदा गरिबी, जवळपास डॉक्टरांची / उपचारकांची उपलब्धता नसणं, उपचारांचा दीर्घ काळ, वेगवेगळ्या पातळ्यांवर सातत्याने करावे लागणारे छोटे- मोठे वेगवेगळे प्रयत्न या सगळ्याचा परिणाम म्हणूनही उपचारांमध्ये कमतरता निर्माण होते.
मुके प्राणी ज्याप्रमाणे स्वतः स्वतःवर उपचार करू शकत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती त्यांना होणारा त्रास नीट सांगू शकेलच असं नाही. उपचारांचं महत्व त्यांना सुरूवातीलाच कळेल असं नाही. महत्व कळून उपचारांमध्ये साथ द्यायची त्यांची इच्छा असेल तरी ते त्यांना प्रत्येक वेळी जमेलच असं नाही. ह्या सगळ्या शक्यता तथाकथित आजारी नसलेल्या व्यक्ती लक्षात घेऊ शकलो तर मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींना उपचारांच्या बरोबरीने त्यांच्या हक्काचं प्रेम मिळेल. ह्या प्रेमामुळे आजारातून आरोग्याच्या दिशेने त्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि अधिक वेगाने होईल.
मीनाक्षी (मानसोपचारक)



Comments